नंदुरबार, दि.2 (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयप्रमुखांनी सैनिक कल्याण निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कार्यालयाचे अध्यक्षा मनीषा खत्री यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांनी म्हटले आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैनिक भूदल, नौदल आणि हवाई दलात कार्यरत असून वेळप्रसंगी प्राणाची आहुती देतात. अशातच सैनिक सेवानिवृत्त होतात. देशातील माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यासाठी सात डिसेंबर हा दिवस ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त 7 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ध्वजनिधी संपूर्ण देशभर संकलित केला जातो.

देशाच्या संरक्षणासाठी ज्या जवानांनी आपले प्राणार्पण केले आहे, अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडी- अडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे तसेच युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्याकरीता ध्वज निधीचा उपयोग केला जातो.

सैनिंकाप्रती समाजाचे ऋण आहे. देशाच्या सीमेचे आणि स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या तसेच देशांतर्गत उद्धभवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्था विषयक समस्या, नैसर्गिक आपत्तीत नागरिकांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या शूरवीर सैनिकांचे ऋण अत्यल्प स्वरूपात फेडण्याची संधी नागरिकांना ध्वज दिन निधीच्या निमित्ताने प्राप्त होत असते. या पार्श्वभूमीवर पुढील प्रमाणे निधी संकलित करावयाचा आहे. त्यात अधिकारी वर्ग व तत्सम पदाधिकारी प्रत्येकी 1200 रुपये, अधिकारी वर्ग दोन व तत्सम पदाधिकारी प्रत्येकी एक हजार रुपये, कर्मचारी वर्ग तीन व तत्सम पदाधिकारी प्रत्येकी आठशे रुपये, तर कर्मचारी चारकडून प्रत्येकी पाचशे रुपये निधी संकलित करावयाचा आहे. संकलित केलेला निधी रोखीने किंवा जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्या नावे धनादेश, धनाकर्षद्वारे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदुरबार येथे जमा करावयाचा आहे.

पंचायत समिती,अक्कलकुवा कार्यालयातर्फे 70 हजाराची मदत

पंचायत समिती कार्यालय,अक्कलकुवातर्फे सैनिक कल्याण निधीस 70 हजार 600 रुपयांची मदत करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) नंदकिशोर सुर्यवंशी यांच्यावतीने कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज पाटील यांनी ध्वजनिधी संकलनाचा धनादेश अपर जिल्हाधिकारी श्री.महेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश पोतदार, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुभेदार मेजर रामदास पाटील आदी उपस्थित होते.