नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 14 : अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागात कोरोना लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून ग्रामीण भागातील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  काठी येथे झालेल्या लसीकरण शिबिरात एकाच दिवशी 400 पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी यांच्यासह युनिसेफ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून प्रशासनाच्या सहकार्याने या शिबीराचे आयोजन केले.  नागरिकांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी मंडप उभारण्यात आला.  नोंदणी करतांना मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर मात करीत शिक्षक आणि आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांनी मंडपापासून दीड किलोमिटर दूर  नेटवर्क असलेल्या जागी टेबल मांडून नागरिकांची नोंदणी केली.

मंडपाच्या जागी आधारकार्ड तपासणी, नोंदणी तपासणी आणि माहिती देण्यासाठी स्वतंत्र पथक नेमन्यात आले होते. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी परिसराच्या गावातील काही प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील याचठिकाणी लस घेतली.

नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लसीकरणाच्या ठिकाणी सेल्फी पॉईटही तयार करण्यात आला.  शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना लसीकरणाचे महत्व आणि कोरोना विषयक मार्गदर्शक सूचना समजावून सांगत होते.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्री.पाडवी म्हणाले, सर्वांना देण्यात येणारी लस एकसारखी आहे. बाहेरील जिल्ह्यात किंवा राज्यात रोजगारासाठी जाताना लसीकरण महत्वाचे ठरणार आहे. आपण स्वत: रांगेत उभे राहून सात इतर नागरिकांनी लस घेतल्यावर तीच लस घेतली आहे. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असल्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.

यावेळी गट विकास अधिकारी  नंदकिशोर सुर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील मालखेडे, युनिसेफ तालुका समन्वयक जितेंद्र वळवी, मोलगीचे पोलीस निरिक्षक धनराज निळे, उपअभियंता भरत पटले, सरपंच स्नेहा पाडवी, ग्रामसेवक नरोत्तम बिऱ्हाडे, डॉ. कुलदिप ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य मिराबाई वळवी, सामाजिक कार्यकर्ता सागर पाडवी आदी उपस्थित होते.  लसीकरण शिबीर आयोजनासाठी आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, युनिसेफ प्रतिनिधी, ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले.            उपविभागीय अधिकारी शाहुराज मोरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना धन्यवाद दिले असून शिबीर यशस्वी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शिबिराचे यशस्वी नियोजन

  • आरोग्य विभाग, युनिसेफ कर्मचारी, ग्रामपंचायत, आशा वर्कर यांची बैठक घेण्यात आली.
  • ग्रामस्थ, प्रतिष्ठित व्यक्ती यांची बैठक घेण्यात येऊन लसीकरणाची माहिती देण्यात आली.
  • गावात ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्रातर्फे वाहनांमार्फत कोविड-19 बद्दल जनजागृती करण्यात आली.
  • युनिसेफ कर्मचारी यांनी गावात घरो घरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवून दिले. आणि अफवांबाबत माहिती देऊन गैरसमज दूर करण्यात आला.
  • युनिसेफ कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य यांच्याद्वारे लसीकरणासाठी यादी तयार करण्यात आली.  
  • महिला बचत गटाची बैठक घेण्यात आली.

ऑनलाईन नोंदणीसाठी 

  • गावापासून 2 कि.मी अंतरावर ज्या ठिकाणी नेट सुविधा होती त्याठिकाणी शिक्षक आणि आरोग्य सेवक एकूण 8 लोकांची टीम तयार करण्यात आली.
  • कॅम्पमध्ये येणाऱ्या लोकांसाठी ग्रामपंचायत तर्फे जेवणाची व्यवस्था आणि लसीकरण झाल्यानंतर चहा बिस्कीट आणि त्याचबरोबर मास्क देण्यात आले.
  • युनिसेफ कार्यकर्ते रवींद्र वळवी, जयसिंग वसावे, प्रदीप पाडवी यांनी पाड्या-पाड्यात जाऊन समुपदेशन आणि बैठका घेतल्या. आणि लसीकरणाचे महत्व पटवून  दिले. लसीकरणाच्या याद्या तयार केल्या.