नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून केले जाणारे सर्वेक्षण केवळ माहिती संकलनासाठी मर्यादीत न ठेवता सर्वेक्षणात आढळणाऱ्या संशयित व्यक्तींची त्वरीत स्वॅब चाचणी करून कोरोना संसर्ग साखळी खंडीत करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले.

तळोदा येथे आयेाजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी श्रीमती सावित्री खर्डे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, संदर्भित व्यक्तींची तातडीने स्वॅब चाचणी करण्यात यावी. त्यासाठी फिरत्या पथकाचा उपयोग करण्यात यावा. अधिक लोकसंख्येच्या भागात सर्वेक्षणासाठी  अधिक पथकांची नेमणूक करावी. अधिक जोखिमीच्या व्यक्तींच्या उपलब्ध यादीचा सर्वेक्षणात उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.

श्री.पाटील यांनी तळवे आणि चिनोदा येथील सर्वेक्षणाची माहिती घेतली आणि नागरिकांशी संवाद साधला.