नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत सूचना व शासनाकडील वेळोवेळी शिथिल निर्बंध आणि मुभा देण्यात आलेल्या बाबीं संदर्भातील आदेश कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात 1 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून 15 मे  2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत  संचारबंदीची मुदत वाढविण्याचे निर्देशीत केले आहे.

यापूर्वीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी  7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील.  जिल्ह्यात आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी  पूर्णत: संचारबंदी लागू असून  वैद्यकीय सेवा, औषध दुकाने,  पाणी, विद्युत, गॅस वितरण, दुध विक्रेता, वृत्तपत्र छपाई व वितरणास मुभा राहील.

कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.