नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांच्या अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगांव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अनेर, करवंद, अमरावती मध्यम प्रकल्प असे एकूण 11 मध्यम प्रकल्प, 45 लघु प्रकल्प, 22 कोल्हापुरी बंधारे, 30 वळण बंधारे व नंदूरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा असे 3 मध्यम प्रकल्प, 33 लघु प्रकल्प, 6 कोल्हापुरी बंधारे,  20 वळण बंधारे अधिसूचित नदी-नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर 2020  पर्यंत पाणी अर्ज सादर करायचे आहेत.

          सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात.

 मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल. टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही.

लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज  क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत पाणी साठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधित उपविभागाद्वारे शेतीसाठी पाणी अर्ज स्विकारले जातील, असे  कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी कळविले आहे.