नंदुरबार (प्रतिनिधी):– भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ८९ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील बालवीर चौकात मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. तसेच कोरोनाबाबत घरातच सुरक्षित राहून “मीच माझा रक्षक” याबाबत अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. याचबरोबर रविवारी छत्तीसगड येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या १७ भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांच्या हस्ते हुतात्मा भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या अभिवादन प्रसंगी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी कोरोनाबाबत जनतेने काळजी घेऊन आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. शक्यतोवर गर्दीपासून लांब राहून घरातच सुरक्षित राहून ” मीच माझा रक्षक ” याबाबत अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले . याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, सदस्य संभाजी हिरणवाळे, अरविंद खेडकर, गोपाळ हिरणवाळे, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मास्क लावून प्रबोधन केले.