नंदुरबार (प्रतिनिधी) – केंद्र शासनाकडून करण्यात आलेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात आलेल्या आकडेवारीने जैन समाजाच्या भावना दुखावल्या असून, ही आकडेवारी समाजाची बदनामी करणारी आहे. त्यामुळे नव्याने सर्वेक्षण करून खरी माहिती समोर आणावी, अशी मागणी जैन समाज बांधवांनी केली आहे.
याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्राकडुन राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षण ५ चा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात जैन धर्मीयांत १४.९ % पुरुष, ४.३ % महिला मासांहारी असल्याचे दर्शविण्यात आले आहे. जैन समाज हा शाकाहाराचा पुरस्कर्ता आहे. हे सर्वेक्षण चुकीच्या माहीतीवर आधारीत आहे. जैन समाजाचा त्यावर विश्वास नाही. आमच्यापर्यंत कधीच कोणी माहिती विचारण्यासाठी आलेले नाही. हा जैन समाजाच्या बदनामीचा डाव आहे. सर्व्हेला सत्याचा आधार नाही. चुकीचा माहीतीवर ते आधारलेले आहे. त्याचा सकल जैन समाज निषेध करतो. संपूर्ण देशात अश्या चुकीच्या माहीतीमुळे आक्रोश पसरत आहे. जैन समाज लहानशा मुंगीला मारण्यात पाप समजतो. “अहिंसा परमो धर्म”, “जीयो और जीने दो” ह्या मुलभुत तत्वावर चालणाऱ्या जैन समाजावर असा आक्षेप करणे म्हणजे त्या समाजाचा अहिंसक समाज असलेल्या प्रतिमेचे हनन आहे. अल्पसंख्यांक असलेल्या जैन समाजाच्या धार्मिक भावना दुःखविल्या जात असल्या कारणाने ह्या सर्वेचा पुनःसर्वेक्षण केले पाहीजे व झालेले सर्वेक्षण रद्द करण्यात यावे. संपूर्ण जैन समाजाचा भावना लक्षात घेवुन ह्या गोष्टीवर त्वरीत लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर श्री समस्त दिगंम्बर जैन समाज नंदुरबार, श्री जैन श्वेतांबर मुर्तीपूजक संघ नंदुरबार, श्री जैन स्थानकवासी संघ नंदुरबार, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी संघ नंदुरबार यांच्या अध्यक्षांसह सुरेश जैन, विरल कुवाडीया, पिनल शाह, कमलेश जैन, किर्तीभाई शहा आदींच्या सह्या आहेत.