नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन डीसीज’ या साथरोगाचा रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी  पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उ. दे. पाटील यांनी केले आहे.

‘लम्पी स्कीन डीसीज’ हा प्रामुख्याने गाई व म्हशींना होणारा विषाणूजन्य  साथीचा आजार असून देवी  विषाणू गटातील कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे हा आजार होतो. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या रोगाचा प्रसार बाह्य कीटकांसह डास, माशा, गोचिड इत्यादी तसेच बाधित जनावरांच्या  त्वचेवरील व्रण व नाकातील स्त्राव, दूध, लाळ, वीर्य इत्यादी माध्यमामार्फत संसर्ग असल्याने या‍विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे होऊ शकतो. त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत.

सदर रोगाची लागण पशुपासून मानवांना होत नसल्याने पशुपालकांनी घाबरु नये. रोगग्रस्त पशुपासून उत्पादीत होणारे दूध व त्या पासून तयार होणारे पदार्थ आहारास हानीकारक नाहीत. निरोगी जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत. गाई, म्हशी एकत्रितपणे बांधले जात असल्यास  म्हशींना स्वतंत्र बांधण्याची व्यवस्था करावी. त्वचेवर गाठी दर्शविणारी अथवा ताप असणारी जनावरे निरोगी गोठ्यात बांधू नयेत. बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरीता तसेच चराई करता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवांचा प्रवेश टाळावा. तसेच गोठ्यात त्रयस्थ नागरिकांचा प्रवेश टाळावा. जनावराच्या गोठ्यात औषधांची फवारणी करावी.

प्रादुर्भावग्रस्त भागातील जनावरांची 10 किलोमीटर परिघातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशू प्रदर्शने इत्यादीवर बंदी आणावी. बाधित परिसरात स्वच्छता ठेवून आवश्यक जैवसुरक्षेसह 2 टक्के सोडियम हायपोक्लेाराईट, पोटॅशिअम परमँगनेट द्वारे निर्जंतुकीकरण करावे. रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह 8 फूट खोल खड्ड्यात पुरुन मृतदेहाच्या खाली -वर चुन्याची पावडर टाकावी. बाधित गावांमध्ये तसेच बाधित गावापासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील चार महिने वयोगटातील गाय वर्गातील जनावरांचे लसीकरण करण्यात यावे.

पशुपालकांनी लम्पी स्कीन डीसीज लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आजारी जनावरांवर औषधोपचार करुन घ्यावेत. तसेच आजारी जनावरे आढळल्यास 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.