नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मंगल कार्यालय, लॉन्स व इतर सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी होणारे लग्न व इतर समारंभासाठी 5 दिवस आधी स्थानिक पोलीस स्टेशन किंवा स्थानिक स्वराज्य सस्थेला लेखी स्वरुपात कळविणे आणि कोविड-19 च्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याबाबत हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी यासंबंधितचे निर्देश दिले आहेत.
आयोजक तसेच संबंधित आस्थापना मालकांनी 5 दिवस आधी स्थानिक पोलीस स्टेशन, नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक राहील. घरी होणाऱ्या कार्यक्रमांबाबत देखील आयोजकांनी 5 दिवस आधी लेखी स्वरुपात कळवून हमीपत्र देणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
सामाजिक,राजकीय, क्रिडा, मनोरंजन,शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारे मेळावे, कार्यक्रम इत्यांदीना पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजक, संस्था, व्यक्ती विरुद्ध दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.
रेस्टॉरंट, शाळा, उद्याने, धार्मिक स्थळे, इतर ठिकाणी देखील गर्दी होऊ न देणे व शारीरिक अंतराच्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे. कुठलेही कार्यक्रम, समारंभ तथा इतर वाहतूक करतांना कोविड विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखणेकामी वेळोवेळी पारीत केलेल्या आदेशांचे पालन करुनच वाहतूक करणे आवश्यक असेल.
कोरोनाविषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी तसेच दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल होणे यात समन्वय व सुसूत्रता आणण्यासाठी विभाग निहाय जबाबदारी देण्यात आली आहे.
नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी दुकाने व इतर आस्थापना यांचे दर्शनी भागात ‘विना मास्क प्रवेश बंदी ’या प्रकारचे फलक लावण्याबाबत सूचना द्याव्यात. कोविड-19 च्या नियमांबाबत जनजागृती करण्यात यावी. बाजाराच्या ठिकाणी जागा निश्चित करुन दोन दुकानामध्ये पुरेसे अंतर ठेवण्यात यावेत. बाजारात गर्दी होणार नाही, याचे नियोजन करावे.
सर्व मेडीकल,भाजीपाला, दुध, किराणा , दुकानदार व पेपर विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. ज्या प्रभागात,वार्डत कोविड बांधित रुग्ण आढळून आल्यास त्याठिकाणी स्वॅब घेण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात यावे. संपर्कात आलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवून त्यांची कोरोना चाचणी करावी. लग्न समारंभ, इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी , सिनेमा हॉल, रेस्टारंट, क्लब, नाईट क्लब इत्यादी आस्थापनाना ठरवून देण्यात आलेल्या क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक अथवा व्यक्ती असल्यास कारवाई करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विना मास्क,रुमाल, मुखपट्टी न आढळल्यास प्रथम 200 रुपये, दुसऱ्यांदा 400 तर तिसऱ्यांदा 400 रुपये दंड व फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. शारीरिक अंतराचे पालन न केल्यास ग्राहक, व्यक्ती व आस्थापना मालक, विक्रेत्यांना प्रथम 200 रुपये, दुसऱ्यांदा 400 तर तिसऱ्यांदा 400 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल. दुकानात क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक असल्यास संबंधितास प्रथम 10 हजार दंड व नोटीस देण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास 1 महिन्याकरिता आस्थापना सिल करण्यात येईल व संबंधित मालक व आयोजक यांचेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
व्यायामशाळा, मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल किंवा घरगुती समारंभाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजक व मालकास प्रथम 10 हजार रुपये दंड व नोटीस देण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास 1 महिन्याकरिता आस्थापना सिल करण्यात येईल व संबंधित मालक व आयोजक यांचेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
घरगुती कार्यक्रमासाठी आयोजकांनी 5 दिवस आधी लेखी स्वरुपात न कळविण्यास व कोविड मार्गदर्शक सूचनाचे पालन न केल्यास वधूपीता, वरपीता, आयोजक यांचेवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संबधित महसुल, स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागास नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
व्यवस्थापक,आगार प्रमुख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानी बस स्टॅन्डच्या ठिकाणी बैठे पथक स्थापन करावे, प्रवाशाकडून कोविड-19च्या अनुषंगाने पारित केलेले आदेश सूचनाचे पालन होत असल्याबाबत खात्री करावी. प्रवासी वाहतूक करतांना शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करावी. बस स्टॅन्डच्या ठिकाणी दर्शनी भागात फलक व जिंगल्सद्वारे कोविड जनजागृती करावी. कोरोनाविषयक नियमांचे पालन न झाल्यास दंड आकारणी करावी. व्यवस्थापक, आगार प्रमुख यांना गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ठिकठिकाणी बैठे पथक स्थापन करावे. खाजगी प्रवासी वाहतूक दरम्यान प्रवासी यांचेकडून कोविड-19 च्या अनुषंगाने पारित केलेले आदेश, सूचनाचे पालन होत असल्याबाबत खात्री करावी. खाजगी प्रवासी वाहतूक करतांना शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार प्रवासी वाहतुक करावी. प्रवासादरम्यान शारीरिक अंतर न पाळणे, विमा मास्क असणाऱ्या प्रवाशांकडून दंडाची आकारणी करावी.
प्रबंधक, रेल्वे स्टेशन, मास्टर यांनी रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी बैठे पथक स्थापन करावे, प्रवासी यांचेकडून कोविड-19 च्या अनुषंगाने पारित केलेले आदेश,सूचनाचे पालन होत असल्याबाबत खात्री करावी. रेल्वे स्टेशन परिसरात दर्शनी भागात कोविड-19 दर्शनी भागात फलक व जिंगल्सद्वारे जनजागृती करावी. शारीरिक अंतर न पाळणे, विमा मास्क असणाऱ्या प्रवाशांकडून दंडाची आकारणी करावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्यासाठी प्रबंधक व रेल्वे स्टेशन मास्तर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
शासकीय कार्यालय परिसरात विनामास्क बंदी करावी, कार्यालयात शारीरिक अंतराचे काटेकोर पालन करावे, तसेच कोविड-19 बाबत शासनाने वेळोवेळी आदेशीत केलेल्या नियमांचे पालन करावे. नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यासाठी कार्यालय प्रमुखांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश, नियमावली, कार्यप्रणाली आलेले आदेश लागू राहतील. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.