नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)   : कोविड-19 संसर्ग नियंत्रणाच्यादृष्टीने ग्रामीण भागातील नागरिकांची शेजारील राज्यात व धुळे जिल्ह्यात ये-जा टाळण्यासाठी  ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

ग्रामरक्षक दलात सरपंच, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी,पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, कोतवाल, मुख्याध्यापक, मोठ्या गावात मुख्यालय तलाठी यांचा समावेश करावा. आवश्यकता भासल्यास गावातील माजी सैनिक, एनसीसी कॅडेट, गावातील पोलीस रेकॉर्ड चांगले असलेले व निरोगी तरुण यांचा गरजेनुसार समावेश करावा.

सदस्यांनी आळीपाळीने 8-8 तासांचे नियोजन करावे. ग्रामसेवकांनी दलातील सदस्यांना ओळखपत्र द्यावे. ग्रामरक्षक दलाने  45 वर्षावरील दीर्घ आजाराच्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करणे, सीमा भागातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे तापमान मोजणे, जिल्ह्यात प्रवेशाचे सबळ पुरावे पहाणे, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कोरोनाबाधित व्यक्तींचे अलगीकरण करणे, गृह अलगीकरणातील व्यक्तीवर लक्ष ठेवणे, गावातील प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्तींची बाहेरील क्षेत्रात ये जा होणार नाही याकडे लक्ष देणे आदी जबाबदारी पार पाडावी.

सदर अंमलबजावणी कोणताही बळाचा वापर न करता सामंजस्याने करावी. वादविवाद, भांडण, अथवा कायदा व सुव्यवस्थेची समस्या उद्भवल्यास पोलीस स्टेशन प्रभारी यांना तात्काळ माहिती द्यावी व पोलिसांनी नंतरची कार्यवाही करावी. ग्रामरक्षक दल पोलीस मित्र म्हणून कार्यरत राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संचारबंदी काळात पास वितरणासाठी नोडल अधिकारी

संचारबंदी काळात नागरिकांना आवश्यक पासेस उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांची नियुक्ती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे (02564-210006) यांनी [email protected]  या ईमेलवर येणाऱ्या अर्जाबाबत समन्वयक अधिकाऱ्यांची मान्यता घेवून संबंधितास ईमेलवर कळवावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, वैद्यकीय परीक्षा, पूर्वनियोजित परीक्षा, नोकरीच्या ठिकाणी रुजू होणे या कारणांसाठी जिल्ह्यात प्रवेश करताना जिल्हाधिकारी यांचा परवाना आवश्यक असेल. नागरिकांनी परवान्यासाठी वरील ईमेलर पत्त्यावर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या सीमा पुढील आदेशापर्यंत बंद

नंदुरबार जिल्ह्याची धुळे जिल्हा, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याला लागून असलेली सीमा बंद करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. केवळ जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, वैद्यकीय परीक्षा, पूर्वनियोजित परीक्षा, नोकरीच्या ठिकाणी रुजू होणे या कारणांसाठी नागरिकांना प्रवेशासाठी मुभा असेल. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे आणि 72 तास पूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे व बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांना दाखविणे आवश्यक असेल. अशा व्यक्तींसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा रॅपीड अँटीजन चाचणीची व्यवस्था करेल. अहवाल निगेटीव्ह आल्यास प्रवेश देण्यात येईल.

जिल्ह्यात लॉकडाऊन असले तरी सार्वजनिक कामे, शासकीय रस्ते, आरोग्यविषयक सोई यासंबंधिची कामे सुरू राहतील. कामावरील मजूरांची व्यवस्था कामाच्याच ठिकाणी करण्यात यावी.  ग्रामीण भागातील पेट्रोल पंप केवळ वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, शासकीय वाहने, शेतीविषयक सर्व  कामांसाठी पेट्रोल व डिझेल वितरीत करतील. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून शेतीविषयक सर्व कामे सुरू राहतील. जिल्ह्याच्या सीमेवरील भागात राहणाऱ्या इतर जिल्ह्यातील व्यक्तींना शेतीविषयक कामासाठी तहसिलदार ओळखपत्र देतील. 

पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शनिवार व रविवारी जनता कर्फ्यु राहील. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी सुचनांचे उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.