नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर विहीत मुदतीत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगांवकर यांनी केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणीची तारीख 16 ऑक्टोंबर 2022 असेल. शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक ) शिष्यवृत्ती व उच्चश्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणीची तारीख 15 नोव्हेंबर 2022 राहील. तरी अधिकाधिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर विहीत कालावधीत नोंदणी करावी.