नंदुरबार (प्रतिनिधी) :- भगवंत आणि संत दगाजी बापू यांच्या आशीर्वादाने आणि सर्व रामभक्तांच्या प्रयत्नांनी आम्ही प्रचंड मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर आलो. ज्या ज्या रामभक्तांनी या संकट काळात आम्हाला मदत केली, त्या सर्वांचे शतशः आभार, अशी प्रतिक्रिया मालसर, जि. बडोदा येथे रामधून कार्यक्रमासाठी गेलेल्या भक्तांनी दिली.

नर्मदेच्या पुरात अडकलेले भाविक श्री वाल्मीक तांबोळी व श्री भरत पटेल यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गेल्या 38 वर्षापासून चौपाळा येथील प. पू. ब्रम्ह. संत दगाजी महाराज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली अखंड रामधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच प्रेरणेतून दरवर्षी श्रावण महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांवर जाऊन राम व श्रीकृष्णाच्या नामजपाचा कार्यक्रम चौपाळा येथील स्व. धनसिंग राठोड, नंदूरबारचे स्व. सखाराम चौधरी, स्व. घनश्याम सोलंकी, श्री. चिंधु तांबोळी, श्री वाल्मीक तांबोळी यांच्या सहभागाने करत आले आहेत. याच कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर नंदुरबार परिसरातील शेकडो भाविक महिनाभर जाऊन रामधून कार्यक्रम करत असतात. यंदाच्या (2023) श्रावण महिन्यात नर्मदा काठावर गुजरात राज्यातील मालसर, तालुका सिनोर जिल्हा बडोदा या ठिकाणी रामधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मालसर येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या धर्मशाळेत नंदुरबार परिसरातील 113 भाविक दिनांक 26 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथून रवाना झाले. नंदूरबारचे श्री वाल्मीक तांबोळी, कोळदा येथील श्री भरत पटेल यांच्या नेतृत्वात गेलेल्या या भाविकांना नंदुरबार येथील श्री शेखर मराठे व श्री ज्ञानेश्वर बंजारा यांनी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली. यादरम्यान काही भाविक वैयक्तिक अडचणीमुळे आपापल्या गावी परत गेले व 67 भाविक तेथे शिल्लक राहिले. अत्यंत उत्साहात हा रामधूनचा कार्यक्रम सुरू असतानाच दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी नर्मदेला पूर आला. समुद्र सपाटीपासून 22 मीटर उंच असलेल्या मालसर गावात या पुराचे पाणी शीरायला सुरुवात झाली आणि सायंकाळ पर्यंत पंचमुखी हनुमान मंदिर पाण्याखाली गेले. शेजारीच असलेल्या धर्मशाळेतही पाणी शिरून दोन मजली धर्मशाळेचा पहिला मजला पूर्णतः पाण्याखाली गेला. त्या परिस्थितीत रामधूनसाठी जमलेल्या भाविकांना धर्मशाळेच्या बाहेर येणे अशक्य असल्याने त्यांनी धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्यावर आसरा घेतला. धर्मशाळेची जुनी इमारत त्या इमारतीमध्ये असलेले सुमारे 80 भाविक आणि चारही बाजूंनी घेरलेले पुराचे पाणी, अशा परिस्थितीत भाविकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्या भीतीपोटी श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या जय घोषाला तितकाच मोठ्या प्रमाणात जोर चढला.

अशा परिस्थितीत प्राण वाचवण्यासाठी आपल्याला कोण मदत करू शकतो या विवंचनेत असलेल्या भाविकांनी सर्वप्रथम नंदुरबारचे श्री भिका बंडू चौधरी, श्री शेखर मराठे आणि श्री ज्ञानेश्वर बंजारा यांना उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी भाविकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. शिवसेनेचे गुजरात राज्यप्रमुख श्री. एस. आर. पाटील यांना याबाबत कळविण्यात आले. त्यांनी तात्काळ पुराने घेरलेल्या धर्मशाळेतील भाविकांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. त्याचबरोबर गुजरात प्रशासनाशी संपर्क साधून या भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ? त्यासाठी चर्चाही सुरू केली.

नंदुरबारमध्ये आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. हिना गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, पत्रकार रमाकांत पाटील, पंचायत समिती सभापती श्रीमती मायताई मालचे मध्यप्रदेश राज्यातील भाविकांच्या संपर्कातील लोकनेत्यांशी संपर्क साधून मदतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे सुपुत्र व गुजरात राज्याचे जीएसटी आयुक्त श्री चंद्रकांत वळवी, अहमदाबाद येथील क्राईम ब्रँच पोलीस आयुक्त श्री चैतन्य मंडलिक यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती करण्यात आली. या सर्व मंडळीच्या प्रयत्नाने गुजरातचे मुख्यमंत्री, गुजरातचे गृहमंत्री, कृषी मंत्री अशा सर्वांपर्यंत अडकलेल्या भाविकांबाबत माहिती पोहोचली आणि प्रशासन कामाला लागले. या भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी गेलेले सिनोरचे तहसीलदार देखील पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकून पडले. सर्व प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन पथक त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र रात्रीची वेळ आणि नर्मदेचा प्रचंड प्रवाह यामुळे मदतकार्यात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पहाट उजाडण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. तोपर्यंत नंदुरबारचे श्री शेखर मराठे व श्री ज्ञानेश्वर बंजारा, श्री बबलू पाटील हे मालसर येथे जाऊन पोहोचले. त्यांच्यासोबतच भरुच येथील श्री मोहनभाई पटेल यांनी मदतीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. सकाळी काही प्रमाणात पाणी कमी होताच मदत कार्याला सकाळी प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि साधारण दहा वाजेच्या सुमारास सर्व भाविकांना आपत्ती व्यवस्थापन पथक व भाविकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढले.


त्यानंतर गुजरात प्रशासनाने त्या भाविकांना घरी पोहोचण्यासाठी शासकीय बसची व्यवस्था करून दिली व नंदुरबार पासून जवळच असलेल्या निझर गावापर्यंत या भाविकांना सुखरूप पोहोचविण्यात आले. एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलेल्या भाविकांचे निझर येथे श्री जगदीभाई पटेल व भाविकांनी जल्लोषात स्वागत केले व त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. त्यानंतर सर्व भाविकांना वेगवेगळ्या वाहनांतून त्यांच्या गावापर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आले.