नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : रब्बी हंगाम 2021 साठी गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

गहू पिकासाठी प्रति हेक्टरी 37 हजार 500 विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 563 रुपये प्रती हेक्टर , हरभरा पिकासाठी प्रति हेक्टरी 35 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 525 रुपये प्रती हेक्टर तर  उन्हाळी भुईमूगसाठी प्रति हेक्टरी 40 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 600 रुपये प्रती हेक्टर इतका विमा हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. गहुसाठी व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2021 तर उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च 2022 पर्यंत पिकविम्याची रक्कम भरावयाची आहे.

योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे, रब्बी हंगामासाठी नैसर्गीक आपत्ती किड आणि रोग, स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस संरक्षण तसेच पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनास येणारी घट, जसे नैसर्गीक, आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, भुसखलन, दुष्काळ यांना संरक्षण देय आहे.

तसेच पीक काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचीत पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्याच्या आत गारपीट, चक्रीवादळ , बिगर मोसमी पाऊस इत्यादी मुळे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.मुंबई या कंपनीची निवड केली असून योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गीक आपत्तीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीबाबत विमा कंपनी किंवा टोल फ्री क्रमांक 18001024088 वर संपर्क करावा. योजनेत सहभागी होण्यासाठी कृषि विभाग, व बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र व कंपनीचा टोल फ्री क्रमांकावर  संपर्क साधावा.