नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : येत्या मान्सून काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लघू व मध्यम प्रकल्पांची संयुक्त पाहणी करुन धरणांवरील वायरलेस यंत्रणा कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने पाटबंधारे विभागास दिल्या आहेत.
जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने कळविल्यानुसार, कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या लघू व मध्यम प्रकल्पांची दुरुस्ती मान्सून सुरु होण्यापूर्वी करावी. यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता यांनी लघु व मध्यम प्रकल्पांची पाहणी करुन धरण, प्रकल्प सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे. धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग, नद्यांच्या पाणीपातळीनुसार सोडण्याचे नियोजन करावे. विसर्ग सोडण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची मान्यता घेण्यात यावी व त्याबाबतची पूर्व कल्पना प्रशासनास द्यावी.
नदी किनाऱ्यावरील सखल भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना नदीच्या पाणी पातळीबाबत पूर्वसूचना देण्यात यावी.रात्री, अपरात्री पुर्वसूचना देता येईल अशी यंत्रणा स्थापित करावी.यासाठी नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पुरग्रस्त गावे दर्शविलेला नकाशा जिल्हाधिकारी यांना सादर करावा. दैनदिन पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग, पर्जन्यमान इत्यादींचा दैनदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावा. धरणांवर वायरलेस यंत्रणा, पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित करावे. यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा मनीषा खत्री यांनी पाटबंधारे विभागास दिल्या आहेत.