नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्यात मध उद्योगाला चालना व गती देण्यासाठी संचालक, मधसंचालनालय, महाबळेश्वर तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2023-2024 पासून मधमाशी मित्र पुरस्कार वितरीत केला जाणार आहे. यासाठी मधपाळ, प्रगतीशील मधपाळ, ब्रॅन्ड धारक मधपाळ शेतकरी, सातेरी, मेलीफेरा, आग्या मधमाशीपालन, मध संकलनात कार्यरत असणाऱ्या घटकांनी 5 मे 2023 पर्यंत मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आर.एल.चव्हाण यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.

            मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, व्यक्तीं किंवा संस्थेने मध उद्योग प्रशिक्षण घेऊन किमान 10 वर्ष मध उद्योगांचे कार्य केलेले असावे. सर्वात जास्त मधोत्पादन व वसाहती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मध उद्योगात विस्तार, प्रशिक्षण, प्रजननाद्वारे वसाहत संख्या वाढविणे, संशोधन, मधोत्पादन, मेनउत्पादन, साहित्य निर्मिती, प्रयोग, मधप्रक्रिया व उप उत्पादनांचे संकलन, रॉयल जेली, पराग, विष ,प्रोपोलिस इत्यादी क्षेत्रात काम केलेले असावे. स्वत:चा ब्रॅन्ड व वसाहत विकसित करुन विक्री करण्यास प्राधान्य देण्यात येईल. अर्जदार शासनाच्या उपक्रमांत सहभागी असावा. मंडळाकडे मध पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

            पुरस्काराची अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला, रुम नंबर 222, नवीन प्रशासकीय इमारत,  जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210053 ) येथे संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील मधमाशी पालन उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांनी  परिपूर्ण अर्ज भरुन 5 मे 2023 पर्यंत जिल्हा कार्यालयात सादर करावेत असे आवाहन श्री.चव्हाण यांनी केले आहे.