नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी शासकीय आश्रमशाळा येथे उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतीगृह इमारतीचे  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बर्डी येथे मुलांचे वसतीगृह आणि कर्मचारी वसाहतीसाठी पुढील वर्षात तरतूद करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

 कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी,  जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, दिलीप नाईक, जि. प.सदस्य सी.के.पाडवी, रुपसिंग तडवी, कार्यकारी अभियंता डी. बी.बागुल, प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, तहसीलदार रामजी राठोड  आदी उपस्थित होते.

अॅड.पाडवी म्हणाले,इमारती उभ्या करण्यासोबत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यापन पद्धतीत बदल करीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागतील. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन उच्च शिक्षित व्हावे आणि गावाचा विकास घडवून आणावा.

वसतीगृह इमारतीमुळे विद्यार्थ्यांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. बर्डी आश्रमशाळेची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. कोरोनाच्या संकटातही विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी एकत्रितरित्या चांगले काम केले आहे. गतवर्षी राज्यातील आश्रमशाळा बांधकामासाठी 500 कोटींपेक्षा जास्त आणि यावर्षी 600 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षकानी विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 तळोदा प्रकल्पांतर्गत 13 इमारतींचे काम सुरू आहे. 8 इमारतींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती श्री. मेतकर यांनी दिली.

मुलामुलींच्या वसतीगृह इमारतींचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत  असल्याची  माहिती श्री.बागुल यांनी दिली.

पालकमंत्री पाडवी यांच्या हस्ते वसतीगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. एमबीबीएस शिक्षण पूर्ण करणाऱ्या बर्डी आश्रमशाळेचा विद्यार्थी सायसिंग वसावे याचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बर्डी येथील इमारतीसाठी 4 कोटी 12 लाख खर्च झाला असून संरक्षक भिंतीचे कामही करण्यात आले आहे.  वसतीगृह इमारतीत 75 मुलींसाठी सुविधा करण्यात आली आहे.  मनोरंजनासाठी सभागृह, अधीक्षक निवास, सिकरूम, अभ्यास कक्ष, भोजनकक्ष आदी सुविधा येथे करण्यात आली आहे.

कार्यक्रमाला परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.