नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील नागरिकांचे बँक खाते आधारशी जोडण्यासाठी आणि प्रलंबित अर्जावर कार्यवाही करण्यासाठी सुटीच्या दिवशी विशेष मोहिम राबवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केली.

जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, विभागीय महाव्यवस्थापक डॉ.अजित मराठे, राकेश कुमार, लिड बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले,  धडगाव आणि तोरणमाळ येथे लवकरच विद्युत वाहिनी व उपकेंद्राचे काम होणार असल्याने इंटरनेटच्या समस्या दूर होतील. बँक अधिकाऱ्यांनी अधिकाधीक नागरिकांना बँक व्यवहाराच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा. गरजूंना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांच्याकडे बँक खाते आवश्यक असल्याने ग्रामीण भागातील विकास गतीमान करण्यात बँकेची महत्वाची भूमीका आहे. निती आयोगाने जिल्हा ‍विकासाच्या विविध घटकांमध्ये झालेल्या प्रगतीबाबत कौतुक केले आहे, तसे बँकेच्या कामगिरीबाबतही प्रगती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बैठकीत प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, जनधन योजना, मुद्रा योजना, पीक कर्ज वाटप यासह विविध योजनांसंदर्भात बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 2021-22 साठीच्या जिल्हा पत आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. 1685 कोटी 73 लक्ष रुपयांचा आराखडा तयार केला आहे. गतवर्षी वितरीत केलेल्या 291 कोटीच्या पीककर्जाच्या तुलनेत यावर्षी 324 कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रब्बीसाठी देखील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत उद्दीष्ट पूर्ण करावे, असे डॉ.भारुड यांनी सांगितले.