नंदुरबार (प्रतिनिधी):- नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी आपल्या खासदार स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांची रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता निधी खात्यामध्ये वर्ग करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना दिलेल्या पत्रात केल्या आहेत.
कोविड 19 अर्थातच कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरल्यामुळे जागतिक महामारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही या रोगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी खासदार स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता कोषामध्ये वर्ग करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्याचबरोबर आपल्या मासिक वेतनातून एक लक्ष रुपये एवढी रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडील माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित हेही उपस्थित होते. देशावर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांनी केलेली मदत नाककुच उपयुक्त ठरणार आहे.