नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते गावात 45 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरण करणाऱ्या सिंदगव्हाण, सागाळी आणि पुरुषोत्तम नगर या तीन ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार डॉ. हिना गावीत, जि. प.अध्यक्ष सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते.
या तिन्ही ग्रामपंचायतींची कामगिरी इतरांना प्रेरक आहे. येथील सरपंच, मुख्याध्यापक, ग्रामसेवक यांनी परिसरातील इतर गावानाही लसीकरण वाढविण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे यावेळी ॲड.पाडवी यांनी सांगितले. एकाच दिवसात 813 जणांचे लसीकरण करणाऱ्या भगदारी गावातील लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
सिंदगव्हाण ग्रामपंचायतीने 45 वर्षावरील 431 नागरिकांचे, सागाळी गावाने 331 आणि पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीने 337 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले या ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी आणि मुख्याध्यापक यांना प्रातिनिधिक स्वरूपात गौरविण्यात आले.
ज्योती पाटील, सरपंच पुरुषोत्तम नगर- नागरिकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून लसीकरण न केलेल्यांची माहिती घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले.
नीता पाटील, सरपंच सिंदगव्हाण- घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
संजय कामडे, सरपंच सागाळी- पहिल्या शिबिरात केवळ 131 जणांचे लसीकरण झाले. लसीकरण न करणाऱ्यांना इतर गावातील शिबिराला भेट देण्यासाठी नेले. लसीकरणानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारपूस केल्याने लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि त्यांचा हुरूप वाढला.