नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते राज्य शासनातर्फे प्राप्त झालेल्या 7 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, जि. प.अध्यक्ष सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक,  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड,  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,  निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे शक्य होईल असा विश्वास ॲड.पाडवी  यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेता येईल. कोरोना बाधितांनादेखील यामुळे चांगली सुविधा उपलब्ध होईल. आपल्या आमदार निधीतून 6 आणि आमदार नाईक यांच्या आमदार निधीतून 7 रुग्णवाहिका मिळणार असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होईल. सर्व मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. आमदार राजेश पाडवी यांच्या आमदार निधीतूनदेखील यापूर्वी 4 रुग्णवाहिका घेण्यात आल्याचे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यासाठी  कोरोना संकटकाळात विविध माध्यमातून 49 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 7 रुग्णवाहिका यापूर्वी शासनातर्फे प्राप्त झाल्या असून इतर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत सामाजिक उत्तरदायित्व निधी व विविध संस्थांकडून प्राप्त झाल्या आहेत. आज प्राप्त रुग्णवाहिका कोपर्ली, मोरंबा, सुलवाडा, कुसुमवाडा, झामणझर, काकडदा, चुलवड येथील आरोग्य केंद्रांसाठी उपयोगात आणल्या जाणार आहेत.

 नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर ‘ॲम्ब्युलन्स ट्रॅकींग सिस्टीम’ विकसीत करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील रुग्णवाहिकेची माहिती आणि  चालकाचा क्रमांक तात्काळ मिळू शकेल.