नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या निती आयोगाने देशभरातून निवड केलेल्या 115 आकांक्षित जिल्ह्यात नंदुरबार जिल्हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन 2018 ते 2022 दरम्यान नियोजनबद्ध पद्धतीने जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांकात सुधारणा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कुपोषण समस्येवर मात करण्याचे प्रयत्न होत असून त्यात यश मिळताना दिसत आहे.

            जिल्ह्यात आदिवासी बांधव ऑक्टोबर ते मे या कालावधीसाठी मोठ्या संख्येने रोजगाराकरिता इतर जिल्हा किंवा परराज्यात स्थलांतरित होतात. ही कुटुंबे मे अखेर जिल्ह्यात परत येतात. परंतु कामाच्या ठिकाणी त्यांच्याकडून आरोग्याच्या बाबतीत खूप दुर्लक्ष होते. त्यामुळे जिल्ह्यात परत आल्यावर कुपोषण, तीव्र रक्तक्षय, दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढते व पुढे एक दोन महिन्यात पावसाळा सुरु होत असल्याने साथीचे आजार बळावतात. अशा दुष्टचक्रात सदर कुटुंबे दरवर्षी अडकतात.

            रोजगाराच्या ठिकाणाहून परत आलेल्या कुटुंबातील महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांची मान्सूनपूर्व तपासणी करण्यात येते. यावर्षीदेखील जिल्हा प्रशासनाने 299 आरोग्य तपासणी पथकांची नेमणूक करुन तपासणी पूर्ण केली. जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालक, स्तनदा व गरोदर माता  यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या पथकांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक, अंगणवाडी व आशा कार्यकर्ती यांचा समावेश करण्यात आला होता.

कोरोनाशी लढताना बालकांना कुपोषणापासून वाचविण्यासाठी‍  महिला व बालविकास विभाग, आरोग्य कर्मचारी व जिल्हा प्रशासन यांनी समन्वयाने विशेष प्रयत्न करण्यात आले. या काळात अंगणवाडी बंद असल्याने बालकांना पोषण आहार शिजवून देणे कठीण हेाते. त्यामुळे दर महिन्याला लाभार्थी कुटुंबाला गहू, मसुर डाळ, चना, चवळी, मुगडाळ, मटकी, सोयाबीन तेल, तिखट, हळद व मीठ देण्यात येते.  पोषक आहार बालकांना देण्याबाबत कुटुंबियांचे प्रबोधनही करण्यात येत आहे.

            या शिवाय सप्टेंबर मध्ये पोषण माह सप्ताह अंतर्गत अंगणवाडीस्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यात पोषणाचे महत्व,  स्तनपानाचे महत्व ,पुरक आहार, लसीकरण, वजनमापन, अन्न सुरक्षा व पोषकत्व, अतिसार, पाणी व स्वच्छता, ॲनिमिया, किशोरवयीन मुलींचे शिक्षण व आहार, गरोदर मातांची आरोग्य तपासणी आणि बाल्यावस्था पूर्व संगोपन व शिक्षण आदी विषयांचा समावेश होता. त्यासोबत गृहभेटीद्वारे कुटुंबांना मार्गर्शन करण्यात आले. चिमलखेडी यासारख्या दुर्गम गावात अंगणवाडी सेविकानी बोटीद्वारे गरोदर मातांच्या घरी भेटी देऊन मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील 2 हजार 401 अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वयोगटातील 1 लाख 49 हजार 797 बालकांची तपासणी करण्यात आली. ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) च्या माध्यमातून  गंभीर तीव्र कुपोषित (सॅम) बालकावर उपचार करण्यात आले असून त्यातील 628 सर्वसाधारण श्रेणीत तर 1462 बालके मध्यम तीव्र कुपोषीत श्रेणीत आली आहेत. सद्यस्थितीत 1 हजार 679 एवढी सॅम बालके असून त्यांच्यावर ग्राम बालविकास केंद्र आणि पोषण पुनर्वसन  केंन्द्रात उपचार करण्यात येत आहे .

जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा सामान्य बालकांप्रमाणे विकास व्हावा हे उद्दीष्ट समोर ठेऊन गावपातळीवर पोषण अभियानाला गती देण्यात आली आहे. सुदृढ बालक रोगापासून दूर राहील आणि त्यातूनच आरोग्याच्या समस्या दूर होतील. महिला व बालविकास विभागाचे प्रयत्न याच दिशेने आहेत.