नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 :  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्ह्यासाठी घेण्यात आलेल्या 10 बाईक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जि. प.चे समाज कल्याण सभापती रतन पाडवी,  निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राहूल पवार, दिलीप नाईक आदी उपस्थित होते.

या बाईक ॲम्ब्युलन्ससाठी एकूण 66 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून  त्यात दोन वर्षासाठी  चालक, देखभाल व दुरुस्ती, चालकाचे मानधन, प्रशिक्षण आदी खर्चाचा समावेश आहे. निती आयोगाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी उपयोगात आणल्या जाणार आहेत.

इतर आदिवासी दुर्गम भागातही सुविधा करणार-ॲड.पाडवी

नंदुरबार प्रमाणे गडचिरोली, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात बाईक ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक निधी आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येईल, असे ॲड.पाडवी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील दुर्गम भागासाठी या रुग्णवाहिकांचा उपयोग करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका उपयुक्त ठरतील.   डोंगराळ भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.