नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यक्षेत्रातील नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

अ गटात-उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजनेत  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना बिगर यांत्रिकी बोट व मत्स्यजाळेसाठी अर्थसहाय्य, युवकांना सामुहिक युवक गटाना बॅन्ड संच व इतर साहित्य, तसेच अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना पॉवर विडर मशिन घेण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल.

क गटात- मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजनेत अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायती व बचतगट यांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांडी संच उपलब्ध करून देणे,  युवकांना क्रिकेट खेळ खेळण्यासाठी क्रिकेट साहित्य संच, ग्रामपंचायतीना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भजनी साहित्य तसेच ग्रामपंचायतीना सार्वजनिक कार्यक्रमासाठी मंडप, खुर्ची, व इतर साहित्य उपलब्ध करुन देणे, तसेच अनुसूचित जमातीच्या पंरपरागत कलापथक व प्रबोधनकारांना समाजात जनजागृती करण्यासाठी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येतील.

या योजनांसाठी इच्छुक आदिवासी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून याबाबतचा विहित नमुना फॉर्म प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार येथे 3 जुलै 2023 ते 14 जुलै 2023 या कालावधीत रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वाटप केले जातील व स्विकारले जातील.  मुदतीनंतर फॉर्म वाटप अथवा स्विकारले जाणार नाहीत.

पात्र आदिवासी लाभार्थ्यांनी योजनेच्या आवश्यकतेनुसार जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला, ग्रामसभा ठराव, रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक पासबुक, योजनेच्या अनुसरून कागदपत्र तसेच यापूर्वी सदर योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रांची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी असेही प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती करनवाल यांनी कळविले आहे.