नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  शासनाच्या विविध वैयक्तिंक लाभाच्या योजना,अवकाळी पाऊस, अतिवृष्टी मदत आदी योजनेचा लाभ देतांना नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा प्रदान कराव्यात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी  केले.

आज महसुल दिनानिमित्त आयोजित उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्या सन्मान सोहळा कार्यक्‌रम बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, प्रकाश थविल, नितीन सदगीर,कल्पना निळ-ठुंबे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी स्वाती लोंढे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ देतांना नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा प्रदान कराव्यात. शासन यंत्रणेत महसूल विभाग हा महत्वाचा असून कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरिकांचे समाधान होईल असे योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. कामाच्या माध्यमातून महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करावी. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या कामाचा निपटारा वेळेत करावा. महसूल विभागाने यावर्षी फेरफार पत्रक, डिजिटल सातबारा उतारा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, नैसर्गिक आपत्ती, कोविड, निवडणुका, अमृत सरोवर, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी मदत तातडीने पोहचविण्याचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी श्री.पाटील म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील महसुल अधिकारी व कर्मचाऱ्याची टिम वर्क कामकाजाची पद्धत अत्यंत चांगली असून मागील वर्षी जिल्ह्याने संगणकीय सातबारा उतारा वाटप, महसुल वसुली,मोफत सातबारा वाटप,लोकाभिमुख कामकाज तसेच इतर कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे. त्यामुळे मागील वर्षांप्रमाणे आता यावर्षीही आपली सर्वांची कामाची जबाबदारी वाढली आहे त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे. यावर्षी  पोटखराब, ई -पीक, ई- चावडीचे काम  चांगल्या पद्धतीने  चांगले कामे करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले की, महसुल व पोलीस विभाग हे दोन प्रशासनाचे महत्वाचे विभाग असून जेव्हा हे दोघे एकमेकाच्या समन्वयाने काम करतात तेव्हा त्या जिल्ह्यातील सर्व कामे अत्यंत चांगले होतात याची दखल राज्यस्तरावर देखील घेतली आहे. त्यामुळे काम करत असतांना कुठलीही अडचण येत असल्यास ती वरीष्ठांना सांगावी जेणेकरुन ती त्वरीत सोडविता येईल. तसेच महसुल दिनानिमित्त ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्या सर्वांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ ठुंबे, नायब तहसिलदार नितीन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात  अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मीनल करनवाल, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, तहसिलदार गिरीष वखारे, उल्हाद देवरे, नायब तहसिलदार नितीन पाटील, अजित शिंत्रे, सुदाम चोरे, रामजी राठोड, लघुलेखक दिनेश गुरव,अव्वल कारकुन श्रीमती. अस्मिता रघुवंशी, वामन चौरे, प्रदिप पाटील, ज्योती ठाकरे, गणेश बोरसे, मंडळ अधिकारी चंद्रसिंग नाईक, विलास चौरे, विठ्ठल उकर्डे, तलाठी गुमान तडवी, सरवरसिंग पाडवी, लक्ष्मण कोळी, उमेश राठोड, लिपिक मनोज सुर्यवंशी, योगेश कोळी, जगदीश मराठे, ओंकार पाडवी, वाहन चालक रघुसिंग ठाकरे,  शिपाई  रमेश वसावे, सोनु कुवर, रमेश इंदवे, भटु भील, स्वच्छक रविंद्र मोरे, कोतवाल विमल गावीत,भुपेंद्र वसावे, सुमित्रा राहसे अशा  महसूल विभागातील उत्कृष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा व क्षेत्रीय कार्यालयातील  अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत उल्लेखनिय  काम केलेल्या तलाठी संवर्गातील  जयेश राऊळ, राजेंद्र साबळे, राजेश पार, भिक्या पाडवी, सुनिता साळुंखे, किसन पावरा, यांचा तर ई पीक पाहणीत उल्लेखनिय काम केलेल्या तलाठी पंकज वसावे, अमित गावीत,बळीराम चाटे, गुलाब पाडवी, धर्मराज चौधरी, देवेंद्र गांगुर्डे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उल्हास देवरे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व तहसिलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.