नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) :सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. प्रत्येक दुकानदाराचे लाभार्थी कोण, शिधापत्रिकाधारकांना किती धान्य अनुज्ञेय आहे. याबाबतची माहिती आता संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यासाठी शिधापत्रिकाधारकांना http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा पर्यायामध्ये ‘ऑनलाईन रास्त भाव दुकाने’ यावर क्लिक करुन सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून यात कोणत्या दुकानात किती लाभार्थी आहेत. दुकानातून किती धान्यांची विक्री झाली. कोणत्या शिधापत्रिकेवर किती धान्य दिले गेले याबाबतची सर्व माहिती शिधापत्रिकाधारकांना आता बघता येईल.

            तसेच स्मार्टफोन मधील प्ले स्टोअर वरुन ‘मेरा रेशन’ हे मोबाईल ॲप  इंस्टॉल करुन आपला 12 अंकी रेशनकार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर नमूद केल्यास रेशनकार्डवर किती धान्य देय आहे. तसेच आपल्या नजीकच्या असलेले रास्तभाव दुकानाची माहिती, धान्य वाटपाचा तपशिल ही बघता येणार असल्याने सर्व शिधापत्रिकाधारकांनी वेबसाईट किंवा ‘मेरा रेशन’ ॲप डाऊनलोड करुन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.