नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी गती देण्यासाठी प्रशासनातर्फे मोहिमस्तरावर प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत 15 ग्रामपंचायत क्षेत्रात 45 वर्षांवरील 100 टक्के नागरीकांचे लसीकरण झाले आहे. त्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी जनजागृतीचे उपक्रम गावतपातळीवर राबविले आहेत. शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. या प्रयत्नांना चांगले यश येत असून लसीकरणाचे प्रमाणही वाढते आहे.
जिल्ह्यात 45 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये नंदुरबार तालुक्यातील शिंदगव्हाण, अजेपुर, बालआमराई, गुजरजांभोली, नवापूर तालुक्यातील वावडी, निमदर्डे, केलपाडा, सागाळी, गंगापूर , शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर, धडगाव तालुक्यातील अस्तंबा, धनाजे, सोन आणि तळोदा तालुक्यातील राणीपुर, जुने सेलिंगपुर या ग्रामपंचायतीचा समोवश आहे.
तर 21 ग्रामपंचायतींमध्ये 45 वर्षांवरील 90 टक्क्यापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील काळंबा, कोळदा, मांजरे, कार्ली, आसाणे, नाशिंदा, खैराळे, नवापूर तालुक्यातील बोकळझर, वराडीपाडा, खानापूर, निबोणी, शहादा तालुक्यातील मोहिदा त.श, बामखेडा त.त., जयनगर, दोदवाडा, लोढरे, अंबापूर, बुढीगव्हाण, तळोदा तालुक्यातील लोभाणी, सतोणा तर अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
पंचेचाळीस वर्षांवरील 25 ते 90 टक्के नागरीकांचे लसीकरण झालेली 401 गावे असून 25 टक्क्यापेक्षा कमी लसीकरण झालेले 111 गावे आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाबद्दल असलेले गैरसमज दूर करुन नागरिकांना लसीकरणाबाबत आवाहन करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था आदींचीदेखील मदत घेण्यात येत आहे. विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना लसीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी लसीकरणाचे 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे. इतरही ग्रामपंचायतींनी 100 टक्के लसीकरण करून कोरोनावर नियंत्रण आणण्यात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.