नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक 2022 करीता राजकीय पक्षांसह निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीबाबत संनियंत्रण समितीच्या आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या, की संपूर्ण निवडणुकीदरम्यान निवडणूक आचारसंहितेचे कटाक्षाने पालन होईल याकडे सर्व विभागांनी लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी सोशल मिडिया सेल, पेड न्यूज समिती, सनियंत्रण समिती, शस्त्र जमा करणे आदी विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरीकांनी आचारसंहिता तक्रारीबाबत दूरध्वनी क्रमांक 02564-210007 वर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.