नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  : जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत कोरोना ‍नियंत्रणाबाबत विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  सुधीर  खांदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.नितीन बोडके, डॉ.राजेश वसावे आदी उपस्थित होते.

यावेळी  बोलताना डॉ.भारुड म्हणाले, रॅपीड अँटीजन चाचणीत पॉझिटीव्ह आढळलेल्या कोरोना बाधितांच्या हातावर शिक्का मारून त्यांच्यावर अलगीकरणात उपचार करण्यात यावे. घरी थांबण्याचा आग्रह धरणाऱ्या बाधित व्यक्तीचे समुपदेशन करण्यात यावे. अशी व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल होत नसल्यास दंडात्मक कारवाई करावी.रेल्वेतील अलगीकरण कक्षात पुरुष बाधित तर तापी महिला वसतीगृह  येथे महिला बाधितांची सोय करण्यात यावी.  एकलव्य कोविड केअर सेंटर येथे कुटुंबाची व्यवस्था करण्यात यावी. गाव आणि वॉर्डनिहाय लसीकरणासाठी नियोजन करण्यात यावे. यासाठी शिक्षण विभागाने पात्र व्यक्तींच्या याद्या तयार कराव्या.

जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविण्यासाठी नवीन यंत्र प्राप्त झालेअसून ते तात्काळ सुरु करावे. शासकीय विश्रामगृह येथे शासनाकडून नव्याने नियुक्त होणारे वैद्यकीय अधिकारी आणि मेडीकल कॉलेजच्या प्राध्यापकांसाठी कक्ष आरक्षीत ठेवावे, असे त्यांनी सांगितले.बैठकीत रुग्णवाहिकेचा उपयोग, कोविड केअर सेंटरमधील सुविधा, ऑक्सिजनचा पुरवठा, कोरोना चाचण्या, लसीकरण आदी विविध विषयांबाबत चर्चा करण्यात आली.