नंदुरबार (प्रतिनिधी) – १० डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार येथे मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील न्या. व्ही. एन मोरे, न्या. ए. आर .कुलकर्णी, न्या. एस. बी .मोरे, जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, पोलीस उपअधीक्षक श्री सचिन हिरे, कारागृह अधीक्षक, श्री आर आर देशमुख, संस्थेचे चेअरमन मा. आ. चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मा. मनोज रघुवंशी उपस्थित होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन देखील या कार्यक्रमात करण्यात आले.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.एन. डी. चौधरी यांनी करून मानव अधिकाराच्या निर्मितीपासून सद्यस्थितीत असलेल्या परिस्थितीबाबत माहिती दिली. अभिरूप न्यायालयाच्या माध्यमातून विद्यापीठामार्फत मानव अधिकाराची जागृती केली जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मा. न्या. व्ही एन मोरे यांनी उद्घाटनपर मनोगतात मानव अधिकार ही संकल्पना ज्या जागतिक सनदेतून निर्मित झाली त्याची तारीखनिहाय माहिती दिली. कायदा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यात न्यायाधीश व वकील या व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कायदेविषयक जागृत केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. न्या.ए.आर. कुलकर्णी यांनी कार्यक्रमात न्यायमंडळ , जिल्हाप्रशासन तसेच पोलीस प्रशासन उपस्थित असल्याने या सर्व घटकांनी मानव अधिकाराबद्दल जनजागृती करण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले. मा. न्या. एस बी मोरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा मानव अधिकारांबद्दल विविध निर्णयांचा दाखला देत दुर्गम व आदिवासी समाजापर्यंत मानव अधिकार जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कायदा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेत येऊन समाजाची सेवा करण्याचे आवाहन देखील केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी मा. श्रीमती मनीषा खत्री यांनी जागतिक स्तरावर मानव अधिकाऱ्यांबद्दल निर्माण झालेल्या विविध अधिवेशनाची माहिती देताना लहान मुल, महिला, निर्वासित यांच्या अधिकाराबद्दल माहिती दिली. संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत रघुवंशी यांनी विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विधी शिक्षणाची संधी संस्थेमार्फत उपलब्ध करता आली व त्यामुळे आज अनेक आदिवासी विद्यार्थी कायद्याबद्दल जागृत होऊन समाजाची सेवा करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आशा तिवारी यांनी केले. कार्यक्रमात जिल्हा प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, विद्यापीठ अंतर्गत विविध विधी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.