नंदुरबार : (जिमाका वृत्त) जलजीवन मिशन योजनेतून कोणतेही गाव, घर आणि व्यक्ती वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच त्यासाठी पुढील आठवड्यात गावनिहाय संरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
ते आज जिल्हा परिषदेत पाणी स्वच्छतेच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित , जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, प्रमोद पाटील (धुळे) कृषी व पशु संवर्धन सभापती हेमलता शितोळे , जि.प. सदस्य जयश्री गावित गटविकास अधिकारी जयंत उगले (नंदुरबार),देविदास देवरे ( नवापूर ), राघवेंद्र घोपरडे (शहादा), पी.पी. कोकणी ( तळोदा), लालु पावरा ( अक्कलकुवा) व अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, ग्रामीण भागात प्रत्येक गावाला आणि गावातील प्रत्येक घराला तसेच घरातील प्रत्येकाला सुक्ष्म नियोजनातून पाणी देणारी ही योजना आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून येणारी ३० वर्षे वाढणाऱ्या लोकसंख्येचा अंदाज घेवून पेयजल योजनेचे नियोजन करावयाचे आहे. त्यामुळे संभाव्य वाढणारी लोकसंख्या व घरे या सर्वांचा अंदाज घेवून या योजनेचे सुक्ष्म नियोजन करावयाचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करावयाची असून या योजनेत ज्या त्रुटी राहिल्या आहेत, त्यांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात प्रत्येक गावाच्या सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेवून योजनेतील अडचणी जागेवरच सोडविल्या जातील. तसेच ज्या ठिकाणी पाण्याच्या स्रोतंअभावी योजनेत अडचणी येत आहेत, अशा गावांनी संभाव्य स्रोतांचा सर्व्हे करून या बैठकीत सादर करावा, तसेच जिया गावांना विभागीय पाणीपुरवठा योजनेत सहभागी व्हायचे नाही त्या गावांनी तसे ग्रामसभेचे ठराव ठराव या बैठकीत सादर करावयाचे आहेत. वर्षभरात एकही गाव पेयजलापासून वंचित राहणार नाही, याबात खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी, पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिल्या आहेत.