नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): कृषि विभागामार्फत खरीप हंगाम 2023 पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पीक स्पर्धा राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर स्वतंत्रपणे आयोजित न करता एकाच वर्षात तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील पीक स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत मानून विजेत्या शेतकऱ्यांची राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भूईमुग व सुर्यफुल या पिकांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठीची बक्षिसे
▪️ तालुका पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 5 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 3 हजार, व तृतीय क्रमांकास रूपये 2 हजार असे स्वरूप आहे.
▪️जिल्हा पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 10 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 7 हजार व तृतीय क्रमांकास रूपये 5 हजार असे स्वरूप आहे.
▪️राज्य पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 50 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 40 हजार व तृतीय क्रमांकास रूपये 30 हजार असे स्वरूप आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा कृषि विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा. असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी कळविले आहे.