नंदुरबार (प्रतिनिधी) – 9 ऑगस्ट, जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री दिपक माळी यांनी माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मीनल वसावे यांनी केले. प्रमुख वक्ते श्री दिपक माळी यांनी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचे किती मोठे योगदान होते हे त्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आदिवासी बांधव हा किती दुर्लक्षित राहिला ,त्यांच्यावर कशा पध्दतीने अत्याचार झाले , आदिवासी साधू संतांनी समाजात धार्मिक वातावरण निर्माण केले हे सर्व श्री दिपक माळी यांनी आपल्या भाषणात मांडले. कार्यक्रमात विद्यालयाचे समन्वयक प्रा. एस. के. चौधरी यांनी आदिवासी या शब्दाची फोड करून त्याचा अर्थ व हा दिवस का साजरा करण्यात यावा असे मनोगतात मांडले. कार्यक्रमाची विद्यार्थी प्रतिनिधी कु. इरा गावित हिने आदिवासी समाजात स्त्रियांना असलेले स्थान व आदिवासी संस्कृती चा परिचय आपल्या मनोगतात करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. डी. पारधी यांनी केले व कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन प्रा. वर्षा घासकडबी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अध्यक्षा सौ सुहासिनी नटावदकर यांनी सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.