नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाडवी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.
ॲड .पाडवी म्हणाले, जिल्हा रुग्णालयावर नागरिकांचा विश्वास आहे. कोरोना काळात येथील डॉक्टरांनी चांगले परिश्रम घेतले आहेत. हा विश्वास टिकविणे सर्वांची जबाबदारी आहे. डॉक्टरांनी सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक रुग्णाची तपासणी करावी. गंभीर रुग्णाच्या प्रकृतीकडे रात्रीदेखील विशेष लक्ष देण्यात यावे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करताना स्वत:च्या प्रकृतीची काळजीदेखील घ्यावी. रुग्णाचे नातेवाईक कोविड कक्षात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
काहीवेळा तपासणीसाठी उशिर झाला असता लक्षणे असताना कोरोना चाचणी निगेटीव्ह येण्याचे प्रसंगी घडत आहेत. अशावेळी नागरिकांनी त्वरीत वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत. लक्षणे असताना घरगूती उपचार करून घरी थांबू नये. डॉक्टरांनी अशा रुग्णांना आजाराची माहिती देऊन त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सांगावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य नियोजन करून प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीकडे लक्ष राहील याची दक्षता घ्यावी. विशेषत: रात्रीच्या वेळी ऑक्सिजन पातळी खालावलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, असे डॉ.भारुड म्हणाले.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. नागरिकांसाठी नियंत्रण कक्ष आणि जिल्हा प्रशासनाने कोविड विषयक माहिती देण्यासाठी तयार केलेले संकेतस्थळ उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.