नंदुरबार (जिमाका वृत्त)  – केरळ राज्यामध्ये नव्याने आढळलेल्या कोरोना च्या जेएन-1 ह्या व्हेरियंटमुळे नागरिक बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या विषाणूच्या चाचणी व उपचाराची सोय मोफत असल्याची माहिती नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. 

 राज्यात आतापर्यंत या आजाराच्या नवीन व्हेरियंटची लागण झालेल्या 35 रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात मात्र या व्हिरियंटची लागण लागण झालेला रुग्ण नाही. या नवीन व्हरियंटमुळे वेगाने लागण होत असली तरी मृत्यूचे प्रमाण फारच कमी आहे. सामान्यतः त्यामुळे श्वसनयंत्रणेशी संबंधित, फ्लू सारखी लक्षणे ताप, सर्दी, खोकला, घशात कण कण जाणवते. या आजाराचे निदान घश्याच्या स्रावाची तपासणी करून आरटीपीसीआर द्वारे केली जाते.  ही चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नंदुरबार) येथे उपलब्ध असून यावर औषधउपचार केल्याने आजार सामान्यतः बरा होतो.नागरिकांनी या आजारबाबत सतर्कता बाळगताना  गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अतिजोखीम असणाऱ्या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यावी. घराबाहेर पडणे आवश्यक असल्यास तोंडाला मास्क लावणे, वारंवार हाथ धुणे, मोकळी हवा असलेल्या ठिकाणी राहाणे, खोकतांना व शिंकताना तोंडासमोर रुमाल धरणे. प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येकाने संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. या आजाराचा कुठलाही धोका समोर आला नसला तरीही काळजी घेणे आवश्यक आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात मिळेल मोफत उपचार..

याबाबत काही लक्षणे आढल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. हरिचंद्र गावित, डॉ. रविदास वसावे, यांच्याशी संपर्क साधून मोफत तपासणी व उपचार करुन घ्यावेत. तपासणी व उपचाराची सोय शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे मोफत करण्यात आलेली आहे, असेही डॉ. हुमणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.