नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेतंर्गत असंघटीत अन्न प्रक्रीया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनासाठी सर्वकष मूल्यासाखळी विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य करणे. या उद्देशासाठी 3 ते 18 जानेवारी, 2022 या कालावधीत जिल्ह्यात कृषि प्रक्रीया उद्योगास कर्ज मंजूरी पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी दिली आहे.

            प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना सन 2020-21 व 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी एक जिल्हा उत्पादन या घटकांमध्ये ‘भगर’ या पिकाची निवड करण्यात आली आहे. तसेच ‘भगर’ पिका व्यतिरिक्त इतर चालु कृषि प्रक्रीया उद्योगांसाठीही या योजनेतर्गत लाभ घेता येईल. या योजनेतंर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्क्यांपर्यंत व जास्तीत जास्त रुपये 10 लाख या मर्यादिपर्यंत प्रति प्रकल्पासाठी अनुदान देय असणार आहे. तर गट लाभार्थी जसे स्वयं:सहायता गट, शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संस्था यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंवतवणूक याकरिता पात्र प्रकल्प खर्चांच्या 35 टक्के अनुदान देय आहे. या शिवाय इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहायता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग आणि प्रशिक्षण या घटकांकरिताही लाभ देय आहे.

इच्छुक व्यक्तीं व स्वयं सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी व योजनेबाबतच्या मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन अर्ज https://pmfme.mofpi.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. भागेश्वर यांनी केले आहे.