नंदुरबार : ऑगस्ट महिन्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.  नुकसानग्रस्तांना मदतीसाठी 7 कोटी 75 लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात  पावसामुळे जिल्ह्यातील 26 हजार 461 शेतकऱ्यांकडील  11 हजार 242 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

नंदुरबार तालुक्यातील 283 हेक्टर, नवापूर 3918 हे., अक्कलकुवा 2599 हे., शहादा 1190 हे., तळोदा 125 हे. आणि  अक्राणी तालुक्यात 3125 हे. क्षेत्रातील पिकांचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात जिरायती व फळपिके सोडून इतर बागायती पिकांचा समावेश आहे. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे

 सप्टेंबर महिन्यात झालेला सततचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे 8234 शेतकऱ्यांच्या शेतात 4364 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे  करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून लवकरच अंतिम अहवाल  शासनाला पाठविण्यात येणार आहे.

प्राथमिक अहवालानुसार नंदुरबार तालुक्यात 1170 शेतकऱ्यांचे 985 हेक्टर, नवापूर 5123 शेतकऱ्यांचे 1828 हे., अक्कलकुवा 210 शेतकऱ्यांचे 60 हेक्टर, शहादा 351 शेतकऱ्यांचे 261 हे. आणि अक्राणी तालुक्यात 1380 शेतकऱ्यांच्या 1230 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.  यात प्रामुख्याने कापूस, ऊस, मका,सोयाबीन , मिरची, तूर, भात आणि ज्वारी पिकांचा समावेश आहे.