व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक विभागातील पालकमंत्री व अधिकाऱ्यांशी साधला संवाद

नंदुरबार : -‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही केवळ मोहिम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य साक्षर महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा मानस आहे. आपले कुटुंब, गाव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड के.सी.पाडवी , जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा शल्य चिकीत्सक  डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,  मोहिमेच्या माध्यमातून राज्याचा आणि जिल्ह्यांचा हेल्थ मॅप तयार करता येणार आहे. त्यामुळे सुदृढ आणि आरोग्याच्या बाबतीत देशात अग्रेसर असलेला महाराष्ट्र बनविण्यास मदत होईल. सर्वेक्षणासोबतच व्यापक स्वरूपाची जनजागृतीदेखील करावी लागणार आहे. सर्वेक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणीसोबत नागरिकांशी संवाद साधावा.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक लस तयार होईपर्यंत नागरिकांनी मास्क घालणे, स्वच्छ हात धुणे आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन  करणे आवश्यक आहे. अनलॉकची प्रक्रीया पुढे नेत असताना जनजागृतीच्या या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक या मोहिमेत सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संकटाच्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक सर्व उपाययोजना शासन करीत आहे.  अशावेळी जनतेचे सहकार्यदेखील आवश्यक आहे. काही बाधित व्यक्ती गृहविलगीकरणातही बाहेर फिरताना दिसून येत आहेत. त्यांनी आपल्या स्वत:सोबत, कुटुंब, समाज यांचीही काळजी घ्यायला कोरोनामुक्तीच्या कामाला जनचळवळ बनविल्याशिवाय राज्य कोरोनामुक्त होवू शकणार नाही, आणि त्यामुळेच या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अडचणींवर मात करून मोहिम यशस्वी करण्याचे प्रयत्न-ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार जिल्ह्यातील काही भाग डोंगराळ आणि दुर्गम असतानादेखील  येणाऱ्या अडचणींवर मात करून मोहिम यशस्वी करण्यासाठी  आरोग्य यंत्रणा चांगले प्रयत्न करते आहे, असे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून त्यामुळे कोरोना साखळी खंडीत करण्यास मदत होत आहे. बाधित व्यक्तींचा चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजन प्लँटचे काम सुरू करण्यात येणार आहे.

नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जागृती करण्याचे प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी स्थानिक भाषेचादेखील उपयोग प्रभावी ठरला आहे. रुग्णांच्या वाहतूकीसाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येत आहे. आदिवासी विभागामार्फतदेखील रुग्णवाहिका घेण्यात येणार असून शासनानेदेखील त्यासाठी व रेमडीसीवर उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 19 हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, तर 1  लाख 16 हजार घरांना भेटी देण्यात आल्या आहेत.काही  ग्रामपंचायतींनी आरोग्य सुविधेसाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात 95 टक्क्यापेक्षा जास्त चाचण्या आरटीपीसीआर लॅबच्या माध्यमातून होत आहे. 8 खाजगी ठिकाणी कोरोना उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,  जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदी उपस्थित होते.