नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सन 2021-2022 या आर्थिक वर्षांत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन कर, पर्यावरण कर, नोंदणी शुल्क, परवाना शुल्क, तडजोड शुल्क, इत्यादीच्या माध्यमातून 39 कोटी 63 लक्ष एवढ्या रक्कमेची वसूली करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे.

गत वर्षांच्या तुलनेत यावर्षी एकूण वसूलीमध्ये 1 कोटी 66 लक्ष रुपयांची वाढ झाली आहे. यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन कारवाई करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात एक वायुवेग पथक कार्यरत करण्यात आला होता. या पथकाद्वारे सन 2021-2022 या वर्षांत ओव्हर लोड वाहतूक, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, वाहनांमध्ये अनाधिकृत बदल करणे, यांत्रिकदृष्टया वाहन सुस्थितीत नसणे, वाहनाचा विमा नसणे इत्यादी विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या 2 हजार 325 वाहनांविरुध्द कारवाई करुन 3 कोटी 38 लक्ष रुपये तडजोड शुल्क व कर वसुली करण्यात आली आहे.

तर दारु पिऊन वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, धोकादायकरित्या वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक करणे इतयादी गुन्ह्यांकरीता 217 वाहनचालकांचे ड्रायव्हींग लायसन्स निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र गुजरात सिमेवर असलेल्या नवापूर सिमा तपासणी नाका येथे या वर्षांत 31 हजार 627 वाहनाविरुध्द कारवाई करुन 9 कोटी 18 लक्ष  तसेच अक्कलकुवा सिमा तपासणी नाका येथे 10 हजार 323 वाहनांकडून 3 कोटी 88 लक्ष रुपयांची तडजोड शुल्क व कर वसुली करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सन 2021-2022 वर्षांत एकूण 12 हजार 179 नवीन वाहनांची नोंद झाली असून त्यात 9 हजार 158 दूचाकी, 1 हजार 165 कार/जीप, 61 रुग्णवाहिका, 1 हजार 385 ट्रॅक्टर, 146 ट्रेलर,227 मालवाहू वाहने, 28 जेसीबी, 8 टॅक्सी, 1 ऑटोरिक्षा व अन्य वाहने यांचा समावेश आहे.

            ही महसूल वसूली करण्यासाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, तसेच कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.