नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात 19 हजार 500 दिव्यांगांची नोंदणी झाली आहे, दिव्यांग कल्याण विभागामार्फत ‘दिव्यांगाच्या दारी’ अभियानात 7 सप्टेंबर 2023 रोजी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्ष मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

दिव्यांगाच्या दारी हे अभियान शासनाच्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून या अभियानाचा एक भाग म्हणून श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह (नंदुरबार ) येथे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केल्या जाणाऱ्या या मेळाव्यात महसूल, पंचायत समिती, नगरपालिका, सामाजिक न्याय विभाग, सर्व शासकीय महामंडळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सार्वजनिक आरोग्य विभाग, (जिल्हा शल्य चिकित्सक)  यासह विविध शासकीय कार्यालयांचे  स्टॉल्स राहणार आहेत.  यामाध्यमातून दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणी व समस्या एका छताखाली सोडविण्यात येतील.

जिल्ह्यात 19 हजार 500 दिव्यांगांची नोंदणी झाली असून दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी या मेळाव्याचे  प्रामुख्याने आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांगांचे अर्ज भरून घेण्यात येतील. तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, यासह विविध प्रमाणपत्रांसाठी नोंदणी  तसेच विविध महामंडळे व शासकीय विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज यावेळी भरून घेण्यात येणार आहेत. 

या अभियानात दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या अभियानाचा लाभ घेण्यासाठी  मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी प्रसिद्धी  पत्रकान्वये केले आहे.

लक्षणीय..

♿️ 7 सप्टेंबरला होणार नंदुरबारला दिव्यांग आपल्या दारी कार्यक्रम.

♿️ श्री. छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर नंदुरबार येथे सकाळी 10 वाजता सुरू होणार मेळावा

♿️ जिल्ह्यात 19 हजार 500 दिव्यांगांची झाली नोंदणी.

♿️ नोंदणी, आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र व विविध  दाखल्यांसाठी नोंदणी करता येणार.♿️ महसूल, पंचायत समिती, नगरपालिका, सामाजिक न्याय विभाग, शासकीय महामंडळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सार्वजनिक आरोग्य विभागासह विविध शासकीय कार्यालयांचे  स्टॉल्स लागणार.