नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीज या साथरोगासारखी लक्षणे आढळून येत असल्याने रोग प्रादुर्भाव प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडील चार महिने वयोगटावरील गाय व म्हैस वर्गातील सर्व निरोगी पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ. दे. पाटील यांनी केले आहे.
लम्पी स्कीन डीसीज रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून 89 हजार 300 हजार गोट पॉक्स लसीची मात्रा प्राप्त झाली असून लसीचे वाटप क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गायी व म्हशींच्या वर्गातील पशुधन संख्येनुसार वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थाना 16 सप्टेंबर 2022 पासून जनावरांमधील रोग सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदूपासून 5 किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात रिंग स्वरुपात लसीकरणास सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पशुपालकांनी पशूंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेतील अधिकारी ,कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे.