नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मानव विकास कार्यक्रमांतर्गत बुडीत मजुरीपासून वंचित राहिलेल्या प्रसूत मातांना मजुरीचे तातडीने वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गाभा आणि नवसंजीवनी समितीची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) विजय शिंदे, सदस्य डॉ. कांतिलाल टाटिया, लतिका राजपूत, संजय महाजन आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रयरेषेखालील प्रसूत मातांना देण्यात येणाऱ्या बुडीत मजुरीची रक्कम त्वरीत देण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केन्द्रात प्रसूत मातांना लाभ देण्यासाठी अपेक्षित यादी तयार करुन तालुकास्तरावर सादर करावी. सर्व नोंदणी झालेल्या सर्व मातांना मजुरीचा लाभ द्यावा. नवसंजीवनी बैठकीचा तालुकास्तरावर यंत्रणेने दरमहा आढावा घ्यावा. प्रसूत मातांना देण्यात आलेल्या बुडीत मजूरीच्या रकमेची वर्षनिहाय माहिती सादर करावी.
दुर्गम भागातील बालकांच्या जन्माची नोंद करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दरमहा बैठकीचे आयोजन करावे. रेशनकार्ड, आधारकार्ड, बँकखाते अद्ययावत करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे. अमृत आहाराचा नियमित पुरवठा करावा. दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी आवश्यक औषधांचा साठा करावा. त्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक औषधाच्या पुरवठ्याबाबत तत्काळ मागणी कळवावी. बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.