नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून 6 अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी 77 लक्ष 94 हजार रुपये एवढ्या खर्चास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मान्यता दिली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा अंगणवाडी प्रकल्पांतर्गत बामणी (वाकीपाडा), गमण (पाटीपाडा), मणिबेली, सुंबीपाडा, चिमलखेडी, आणि जांगठी येथे या अंगणवाड्यांचे बांधकाम होत आहे. अंगणवाडी इमारतीसोबत एक किलोवॅटच्या पॉवर पॅकचाही यात समावेश आहे.
प्रत्येक अंगणवाडीसाठी 12 लाख 98 हजार 890 याप्रमाणे 6 अंगणवाड्यांसाठी 77 लाख 94 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 50 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे.
या भागात अंगणवाडीची सोय झाल्याने परिसरातील माता व बालकांचे पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, पूरक पोषण आहार आदी सुविधा देण्यास मदत होणार आहे. अंगणवाड्यांची इमारत सर्व सुविधांनी युक्त असावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.