राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात टीबी फोरमची स्थापना करण्यात आलेली असून टीबी फोरमच्या समितीची सभा दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे मा. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना मा. जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व क्षयरुग्णांना पोषक आहार, उपचाराचा कालावधी, निक्षय पोषण योजनेअंतर्गत मिळणारा  लाभ याबाबत समुपदेशन करण्यात यावे, तसेच आरोग्य मेळावे घेऊन त्यात संशयित क्षयरुग्णांची तपासणी करून घेण्यात यावी व त्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच ज्या भागात जास्त क्षयरुग्ण आढळतात अशा ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करण्यात यावे. क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी शासनासोबतच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी एकत्रपणे काम करणे आवश्यक असून क्षयरोगाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे.

यावेळी बोलताना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिजित गोल्हार यांनी सांगितले की क्षयरोगाला हद्दपार करण्याचे जागतिक लक्ष्य हे सन 2035 असून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मात्र सन 2025 पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  क्षयरोग निर्मुलनासाठी लोकसहभाग व  क्षयरुग्णांचा त्वरित व योग्य प्रतिसाद महत्त्वाचा असून त्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टिबी फोरमची स्थापना करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार क्षयरुग्ण आढळतात. तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शासनाला देणे बंधनकारक असून माहिती लपविल्यास दंड व शिक्षाही होऊ शकते. तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांना देखील निक्षय पोषण योजनेअंतर्गत दरमहा 500 रुपये लाभ उपचार सुरू असेपर्यंत देण्यात येतो. यावेळेस गरजू क्षयरुग्णांना पोषक आहार पुरवणाऱ्या आधार शैक्षणिक सेवाभावी संस्थेचे प्रा. एम एस रघुवंशी यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर नितीन बोडखे, डॉ. राजेश वळवी, डॉ. सातपुते, अँड. निलेश देसाई, रणजित राजपूत, डॉ. सुहास कदम, डॉ. अंकिता गामीत, डॉ.कल्पेश चव्हाण, बी आर रोकडे, एम व्ही कदम, नितीन मंडलिक व सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.