नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी तळोदा तालुक्यातील राजविहीर येथे कोरोना लसीची पहिला मात्रा घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले.
राजविहीर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने श्री.मोरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून लस घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वाहनचालक सुनिल पाटील यांनीदेखील त्याचठिकाणी नोंदणी करून लस घेतली.
कोरोना लस पुर्णपणे सुरक्षित असून कोरोनामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता 18 वर्षावरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी श्री.मोरे यांनी केले. त्यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाची माहितीदेखील घेतली. गावातील लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना लसीकरणसाठी प्रोत्साहीत करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी तहसिलदार गिरीष वखारे, वैद्यकीय अधिकारी प्रशांत पवार, सरपंच लहू पाडवी, माजी पं.स.सभापती आकाश वळवी, माजी जि.प.सदस्य सतीश वळवी, आरोग्यसेविका चंद्रकला केंद्रे व जिरमा गावीत आदी उपस्थित होते.
बिजादेवी येथे वृद्धांचे लसीकरण
बिजादेवी येथे 80 वर्षाचे वृद्ध वंतीबाई वळवी आणि जंगल्या वळवी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. लसीकरण केंद्रावर जावून त्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली. त्यांचे उदाहरण इतरांसाठी प्रेरक असून नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.
तलवाडे येथे लसीकरण शिबिराला चांगला प्रतिसाद
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बु. येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत 147 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. लसीकरणासाठी जि.प.शाळेच्या शिक्षकांनी पूर्वीच नागरिकांची नोंदणी केली होती. शिबिरासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज गावित, डॉ. चित्रांगिनी खैरनार, आरोग्य सेवक महेंद्र घुगे,अंकिता परदेशी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे काम पाहिले.