नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असून नागरिकांना लसीच्या एक लाख (डोस) मात्रा देण्यात आल्या आहेत.
एकूण 11 हजार 738 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा तर 6 हजार 703 कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. कोरोना योद्ध्यापैकी 14 हजार 327 व्यक्तींना पहिली तर 6 हजार 316 व्यक्तींना दुसरी मात्रा देण्यात आली. 45 ते 60 वयोगटातील व्यक्तींपैकी 25 हजार 37 व्यक्तींना पहिली तर 3 हजार 355 ना दुसरी , तर 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या 28 हजार 284 ज्येष्ठ नागरिकांना पहिली आणि 5 हजार 272 ज्येष्ठ नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
एकूण 79 हजार 386 व्यक्तींना लसींची पहिली मात्रा तर 21 हजार 646 व्यक्तींना दुसरी मात्रा अशा एकूण 1 लाख 1 हजार 32 चा टप्पा या लसीकरण मोहिमेने पुर्ण केला आहे. 14 हजार 372 मात्रा कोवॅक्सीनच्या तर 86 हजार 660 मात्रा कोविशिल्डच्या देण्यात आल्या. लसींच्या 54 हजार 818 मात्रा पुरुषांना तर 46 हजार 214 मात्रा महिलांना देण्यात आल्या.
ग्रामीण भागात तसेच अधिक कोरोना बाधित आढळणाऱ्या भागात विशेष मोहिम राबवून लसीकरणाला वेग देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी विशेष पथकांची स्थापना करून लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.