नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता श्रीरामनवमी, हनुमान जयंती व महावीर जयंती हे उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
श्रीरामनवमी, हनुमान जयंती व महावीर जयंती प्रसंगती लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी हे उत्सव साजरे करावे. दरवर्षी हे उत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.
दरवर्षी प्रमाणे मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये. मंदिरातील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करून द्यावी. या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नये.
कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याआधी व चालू असतांनाच्या मधल्या कालावधीत काही सुचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.
कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.