नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत 15 एप्रिल 2021 पर्यंत महाराष्ट्रातील 6320 शिधापत्रिकाधारकांनी बाहेरील राज्यामध्ये धान्य उचल केली आहे, तर इतर राज्यातील 3511 शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची उचल केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रास्तभाव दुकानात एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत जिल्हांतर्गत पोर्टेबिलीटीद्वारे 28 हजार 229 शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केली आहे.
‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेची सुरूवात 2018 मध्ये करण्यात आली. योजनेअंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणिकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलीटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या चार राज्यात क्लस्टरच्या स्वरुपात प्रायोगिक तत्वावर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जानेवारी 2020 पासून 12 राज्यात तर डिसेंबर 2020 पासून 32 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ही योजना सुरू करण्यात आली आहे. या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशातील राष्ट्र्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कार्डधारक बायोमेट्रीक आधार प्रमाणित करून कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो.
राज्यातील रास्तभाव दुकानातून स्थलांतरीत कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इ. स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतराच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानात त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य प्राप्त करून घेण्याची सुविधा पोर्टेबिलीटीद्वारे ई-पॉस मशिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत शिधापत्रिकेवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करून आधार प्रमाणिकरणद्वारे धान्य वितरीत करण्यात येते.
सर्वसाधारपणे राज्यात दरमहा 7 लक्ष शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलीटीचा वापर करून धान्याची उचल केली जाते. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 94.56 लक्ष शिधापित्रकाधारकांनी जिल्हांतर्गत पोर्टेबिलीटीचा लाभ घेतला आहे. योजनेच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्र.14445 कार्यान्वित करण्यात आला असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.