नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामविकासामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा विषय असून महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय असे सर्वांगीण सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांच्या शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त या अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहांच्या चळवळीची यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी 8 मार्च 2021 ते जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2021 या कालावधीत महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे.
राज्यातील ग्रामीण महिलांना स्वयं सहाय्यता समूहांद्वारे संघटीत करणे व ग्रामसंघ आणि प्रभागसंघाच्या माध्यमातून त्यांचे संघटन अधिक मजबूत करणे हा अभियानाचा महत्वाचा उद्देश आहे. याशिवाय सर्व महिलांची दशससूत्रीद्वारे संघटनाबरोबर आरोग्य, पोषण, स्वच्छता, शिक्षण, जीवन कौशल्ये, इ. बाबत माहिती व प्रशिक्षणाद्वारे क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांना शासकीय सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येईल.
महिलांच्या आर्थिक, सामाजिक इ. सर्वांगिण विकासास चालना देऊन त्यांना गावाच्या विकासात सहभागी करुन मुख्य प्रवाहात आणणे, याकामी शासनाचा सर्व संबंधित विभागांबरोबरच समाजाच्या प्रत्येक घटकास सक्रीय सहभागी करुन महिला सक्षमीकरणाची एक लोक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल.
या अभियानात स्वयं सहाय्यता गट, ग्रामसंघ व प्रभागसंघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी करणे, महिलांचे उपजीविकेचे स्त्रोत वाढविण्यासाठी उत्पादन व सेवा क्षेत्रात उद्योग निर्मितीसाठी निधी व कर्ज वितरीत करणे आणि महिलांच्या उत्पादनांचे मार्केटींग करण्यासाठी आकर्षक ब्रॅन्डींग व पॅकेजींगवर काम करण्यात येईल.
महिलांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी प्रदर्शन, कॉप-शॉप, सहकारी व कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादने विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्वयं सहाय्यता गटांमार्फत शासनाचे विविध विभाग, कार्यालये, संस्था, पंचायतराज संस्था यांना सेवा व साहित्य पुरवठा करणे, बेरोजगार युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देणे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना,कार्यक्रम,अभियानांचा लाभ महिलांना मिळवून देणे यासारखी सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विकासाच्या उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील. महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळा जिल्हा, तालुका तसेच गावस्तरावर घेण्यात येतील.
अभियान कालावधीत निश्चित केलेल्या 10 उपक्रमावर काम करण्यासाठी विविध विभाग सहभागी होतील. अभियानाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतस्तरीय समितीच्या माध्यमातून करण्यात येईल. निकषाप्रमाणे उत्कृष्ट जिल्हा व तालुका निवडून यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबनाकडे नेण्यासाठी आणि त्यादृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान महत्वाचे ठरणार आहे. स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची सुरू झालेली वाटचाल या अभियानामुळे अधिक गतीमान होणार आहे. स्वयंसहायता समूहांना बदलत्या काळानुसार दिशा ठरविण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता बांधणीसाठी हे अभियान उपयुक्त ठरू शकेल.