नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कृषि विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सन 2020-2021 योजना राबविण्यात येत असून यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांकडून 9 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
शेटनेटगृह 1000 वर्ग मिटर 3.25 उंचीचे फ्लॅट टाईपच्या आणि 3 लाख 80 हजाराच्या प्रकल्पासाठी अधिकाधिक 1 लाख 90 हजार अनुदान मिळेल. पॉलीटनेल 1000 वर्ग मिटरच्या 60 हजारच्या प्रकल्पासाठी अधिकाधिक 30 हजार, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर क्षमता 19-16 लिटर 0.69 ते 1.0 एच.पी तसेच बीआयएस प्रमाणकानुसार असलेल्या 7 हजार 600 च्या प्रकल्पासाठी अधिकाधिक 3 हजार 800 रुपये आणि क्रेटस 62 च्या 12 हजार 400च्या ग्राह्य प्रकल्पासाठी अधिकाधिक 6 हजार 200 दोनशे अनुदान असेल.
या योजनेसाठी अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटीकासाठी पाण्याची सोय असावी. यापुर्वी शासनाच्या शेडनेटसाठी अनुदान घेतलेले शेतकरी पात्र असणार नाही. या योजनेंतर्गत लाभार्थी निवडतांना तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास महिला कृषि पदवीधर, महिला गट, महिला शेतकरी गटांना प्राधान्य देण्यात येईल. अक्कलकुवा तालुक्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक व अनुसूचित जमातीसाठी एक असे एकूण दोन लक्षांक देण्यात आले आहेत.
योजनेसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन टप्प्यात अनुदान देण्यात येईल. यात प्रकल्प उभारणी नंतर प्रथम 60 टक्के म्हणजे 1 लाख 38 हजार रुपये अनुदान आणि उर्वरीत द्वितीय 40 टक्के म्हणजेच महत्तम 92 हजार रुपये अनुदान रोपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री, उचल झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात येईल.
योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, अक्कलकुवा जि.नंदुरबार कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अक्कलकुवा यांनी केले आहे.