नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : विशेष केंद्रीय सहाय्य योजना 2017-18 अंतर्गत आदिवासी पुरुष व महिला बचत गटांकडून पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पोल्ट्री फॉर्म व्यवसायासाठी बचत गटातील सर्व सदस्य अनुसूचित जमातीचे असावे. बचत गट नोंदणीकृत असावा. अर्जासोबत बचत गट स्थापनेचा ठराव, सदस्याची यादी, गटातील सदस्याचे जातीचे दाखले, रहिवासी दाखले, फोटो, आधार कार्ड, सर्व सदस्यांचा दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न दाखला (2 लाखाच्या आतील) जमीनीचा सातबारा उतारा, बचत गटाच्या बॅंक पासबुकाची झेरॉक्स प्रत, बँकेचे 6 महिन्याचे स्टेटमेंट, बचत गटास जमीन 5 वर्षेसाठी वापरण्यास देत असल्याबाबत जमीन मालक व बचत गटातील सदस्य यांचे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर हमीपत्र, तसेच यापूर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ग्रामपंचायतीचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र, पोल्ट्री फॉर्म भाड्याने देणार नाही किंवा विकणार नसल्याचे हमीपत्र, देखभाल दुरुस्तीबाबत हमीपत्र सादर करावे.
गटातील किमान एका लाभार्थ्यांकडे स्वत:च्या नावे किमान अर्धा एकर जमीन, बारमाही पाणी, वीज आणि चार चाकी मोठे वाहन जाईल असा रस्ता इत्यादी सुविधा असणे आवश्यक राहील. पात्र लाभार्थ्यांनी 5 मार्च 2021 पर्यंत (कार्यालयीन वेळ 10 ते 6 वाजेपर्यंत ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड नंदुरबार येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.